हैदराबाद - सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त आहे. ज्याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत आहे. जगभरातील असंख्य लोक सध्या तणावात आणि चिंताग्रस्त स्थितीत जगत आहेत. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मानसिक तणाव कमी करणारी आणि मेंदूला चालना देणारी बरीच औषधे आणि उपचार पद्धती सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आयुर्वेदातही अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्या आपल्या या औषधी गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यापैकीच एक औषधी वनस्पती म्हणजे ‘ब्राह्मी’.
ब्राह्मी किंवा बाकोपा मोन्नीइरी (Bacopa Monnieri), ही औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखली जाते. पारंपरिक आयुर्वेदात या औषधी वनस्पतीला खूप महत्त्व आहे. या औषधी वनस्पतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही हैदराबादस्थित एएमडी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राज्यलक्ष्मी माधवम (एमडी आयुर्वेदा) यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, “सुश्रुताचार्य यांनी ब्राह्मी वनस्पतीला ‘मेध्य रसायन’ म्हणून संबोधले होते. या वनस्पतीचा वापर सर्व प्रकारच्या मानसिक आजारांसाठी केला जातो.” त्यांनी या औषधी वनस्पतीचे काही फायदेही सांगितले, ते पुढील प्रमाणे..
1. स्मृतीला चालना देते
एखाद्या व्यक्तीच्या स्मृतीत वाढ करण्यामध्ये ब्राम्ही वनस्पती खुप प्रभावी ठरते. तसेच एखादी गोष्ट शिकण्याच्या क्षमतांना ब्राह्मी चालना देते, असे विविध अभ्यासातून दिसून आले आहे. शिवाय ब्राम्ही मेंदूच्या विविध मानसिक आजारांमध्ये सुधारणा करते. तसेच एकाग्रता वाढवण्यास मदत करते.
2. अल्झायमरवर उपयुक्त
पार्किन्सन आणि अल्झायमर यांसारख्या काही न्यूरोलॉजिकल समस्या; एखाद्या व्यक्तीच्या स्मृती भ्रंश होण्याशी संबंधित असतात. अशा व्यक्तींची स्मृती वाढवण्यामध्ये आणि मेंदूच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यामध्ये ब्राम्ही मदत करते. ही वनस्पती अल्झायमर सारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांसाठी खुप उपयुक्त आहे.
3. तणाव आणि चिंता कमी करते
जेव्हा आपल्या जीवनात बऱ्याच अडचणी एकत्रितपणे येत असतात. अशावेळी चिंता, भीती, घोर, तणाव अशा विविध भावना आपल्या मनात दाटून येतात. विशेषत: जेव्हा भविष्य अनिश्चित असते. या सर्व बाबींचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यावरच होत नसतो, तर शारीरिक आरोग्यावरही होत असतो. ब्राह्मी ही एक अशी औषधी वनस्पती आहे, जी शरीरात कोर्टीसोल (cortisol) किंवा तणाव संप्रेरकाची पातळी कमी करून... तणाव आणि चिंता कमी करते.
4. झोपेचे विकार
जेव्हा मनामध्ये बऱ्याच विचारांची सरमिसळ चालू असते, अशावेळी शांत झोप घेणे फार कठीण जाऊ शकते. मग संपूर्ण दिवस कंटाळवाणा गेला असला तरी शांत झोप घेणे अवघड असते. अशावेळी ब्राह्मी मनाला शांत करुन दर्जेदार झोप घेण्यास मदत करते.
5. मधुमेह
अलीकडील एका संशोधनात असे दिसून आले आहे की, ब्राह्मी वनस्पतीचा वापर मधुमेह विरोधी औषध म्हणून केला जाऊ शकतो. कारण ब्राह्मी वनस्पती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे आपसूकच मधुमेहावरही नियंत्रण राहते.
6. अँटीऑक्सिडंट
ब्राह्मीमध्ये अँटीऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण होते. अशा मुक्त रॅडिकल्समुळे पेशींचे नुकसान होत असते. हे मुक्त रॅडिकल्स हृदयरोग आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग अशा गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच, ब्राह्मी ही एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून महत्त्वाचे कार्य करते.
7. अटेन्शन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी)
आपल्याला माहित आहे की, ब्राह्मी ही विविध न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची (मेंदूसंबंधीत समस्या) लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये एडीएचडीची लक्षणे कमी करण्यात देखील ही वनस्पती मदत करते.
याचे सेवन कसे करावे?
ब्राह्मी ही ब्राह्मी वटी (गोळ्या), ब्राह्मी चूर्ण (पावडर) आणि ब्राह्मी ऑईल (तेल) या स्वरूपात उपलब्ध आहे. ही आयुर्वेदातील सुरक्षित औषधी वनस्पतींपैकी एक आहे. परंतु हे औषध किती प्रमाणात घ्यायचे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक तज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे असते.
ब्राह्मी ही आयुर्वेदातील एक उत्तम औषधी वनस्पती आहे आणि ती खूप प्रभावी असल्याचे सिद्धही झाले आहे. म्हणूनच, अनेक लोकं रासायनिक प्रक्रिया केलेल्या औषधांचे सेवन करण्याचे टाळतात किंवा कमी करण्यास इच्छुक असतात. कारण याचे आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे नैसर्गिक औषधी वनस्पती निवडणे हा कधीही उत्तम पर्याय असू शकतो.
हेही वाचा - गिलॉयला भारताची राष्ट्रीय औषधी वनस्पती म्हणून मान्यता
हेही वाचा - 'वॅलेरियन' या औषधी वनस्पतीने दूर करा तुमचा तणाव