रक्तदाब जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा त्या स्थितीस 'उच्च रक्तदाब' म्हणून संबोधले जाते. वाढत्या वयाबरोबर येणारा आरोग्याचा हा एक मोठा प्रश्न आहे, परंतु अलीकडे केलेल्या अभ्यासानुसार, वाढत्या ताणतणावामुळे अनेक तरुणही अशा उच्च रक्तदाबाच्या आजाराला बळी ठरत आहेत. मात्र औषधे, सकस आहार आणि योग्य जीवनशैलीच्या आधारे ही परिस्थिती बदलली जाऊ शकते.
या व्यतिरिक्त, अशा गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी योगासने करणे खूप उपयुक्त मानले जाते कारण यामुळे शरीराला आणि मनाला आराम मिळतो. तसेच तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. म्हणूनच, उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी ईटीव्ही भारत सुखीभावने पुढील योगासने सांगितली आहेत.
मुलांसाठी आसन (शिशुआसन)
प्रथम जमिनीवर गुडघ्यावर बसावे आणि मन शांत ठेवावे. आता आपली पायाची बोटे एकमेकांच्या जवळ आणावीत आणि गुडघे रुंद ठेवावेत.
आता हळूहळू पुढे वाकावे जेणेकरून आपले कपाळ जमिनीला स्पर्श करेल. असे करता येत नसल्यास मदतीसाठी आपण आपल्या हाताच्या दोन्ही मुठी बंद करून कपाळाखाली ठेवू शकता. आता दोन्ही हात पुढे करून चटईवर ठेवा. एक तर हात पुढे करा अथवा हात वरच्या दिशेला जांघेच्या बाजूला ठेवू शकता.
फॉरवर्ड बेंड (पश्चिमोत्तासान)
जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ रेषेत समोर ठेवा. त्याच बरोबर पाठीचा कणाही सरळ ठेवा. त्यानंतर तुमच्या हातांनी पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आता हळूहळू सावकाश श्वास घेत आपले डोके वाकवूव पायाचे अंगठे धरण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला जितके शक्य होईल तितकेच पुढे वाका आणि हळूहळू पुढे जा. सुरुवातीला स्वत: ला जास्त ताण देऊन वाकण्याचा प्रयत्न करू नका. आता श्वास घ्या आणि पुन्हा मूळ स्थितीत वर या. असे दोन किंवा तीन वेळा पुन्हा करा.
आता पुन्हा पुढे वाकून पायाचा अंगठा पकडत २० ते ६० सेकंदापर्यंत या स्थितीत थांबा. दीर्घ श्वास घ्या आणि सामान्य स्थितीत परत या.
बटरफ्लाय पोझ (बद्धकोनासन)
पाठीचा कणा सरळ ठेवून जमिनीवर ताठ बसा. त्यानंतर आपले गुडघे वाकवा आणि आपले दोन्ही पाय ओटीपोटाजवळ आणा. दोन्ही टाचा एकत्र आणा. या वेळी दोन्ही हात गुडघ्यांच्या बाजूला ठेवा. त्यानंतर दोन्ही हात पायांवर ठेवा. आता श्वास बाहेर सोडत आणि आत घेत आपले गुडघे वरच्या आणि खालच्या दिशेने हलवा. हे आसन १५ ते २० वेळा पुन्हा पुन्हा करा. नंतर आपले पाय समोर सरळ आणा आणि विश्राम करा
ब्रीज पोझ (सेतूबंद आसन)
सर्वात आधी चटईवर जमिनीवर खाली झोपावे आणि गुडगे वाकवावेत. या वेळी पाय शक्य तितके नितंबाजवळ ठेवावेत. तर, आपले दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला ठेवावेत. अर्थात तळवे खालच्या दिशेने असावेत. आता श्वास घेत पाठ आणि नितंब वर उचलावे आणि ते १ ते २ मिनिटांसाठी धरून ठेवावेत. त्यानंतर श्वास सोडत हळूवारपणे मूळ स्थितीत परत या. हे आसन ५ ते १० वेळा पुन्हा करावे.
कोब्रा स्ट्रेच (भुजंगासन)
जमिनीवर पोटावर झोपा. आणि दोन्ही पाय जवळ ठेवा. या वेळी दोन्ही हात बाजूला ठेवा. आता आपले हात आपल्या खांद्याजवळ आणा. आता हळूवारपणे शरीराचा पुढचा भाग वर उचलून छताकडे वर बघण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत १५ ते ३० सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. यानंतर श्वास सोडत असताना मूळ स्थितीत हळूहळू परत या.
ही सर्व आसने नियमित केल्यास आपले शरीर तंदुरुस्त राहते तसेच तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. योगासने नियमित केल्यामुळे केवळ ताणतणाव कमी होत नाही तर शरीरातील रक्ताभिसरणदेखील सुधारते. तसेच उच्च रक्तदाब सामान्यत: जास्त वजन असलेल्या लोकांशी संबंधित असतो. म्हणूनच, योगसनांचा नियमित सराव केल्याने तुमच्या शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. या आणि इतर काही आसनांनंतर आपण ध्यान आणि श्वासोच्छवासाचा व्यायामदेखील करू शकतो. ध्यान केल्याने तुमचे मन शांत होते आणि तणाव दूर होतो. तसेच योगासनांमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि शरीरातील रक्ताभिसरण वेगही सुधारण्यासही मदत होते.
हेही वाचा - कोव्हिड-१९'दरम्यान आणि नंतरचा आहार