हैदराबाद - संपूर्ण जग कोरोना विषाणुशी झुंज देत आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी लस बनवण्याच्या स्पर्धेत जगातील अनेक देश सहभागी झाले आहेत. नेचर कम्युनिकेशन्स या मासिकाच्या अनुसार कोरोनाच्या विरोधातील या लढाईत प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले अँटीबॉडी किंवा प्रतिपिंड हे उपयुक्त सिद्ध होऊ शकते.
प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या अँटीबॉडीला मोनोक्लोनल नावाने ओळखले जाते. याला एका पेशीला क्लोन करून तयार केले जाते. त्याचमुळे या अँटीबॉडी विकसित करणे आणि त्यांचा उपयोग करणे सोपे जाते.
ही अँटीबॉडी विषाणुच्या वरच्या स्तरावर असलेल्या प्रोटिनवर हल्ला चढवते. विषाणुने पसरलेले आजार नष्ट करण्यासाठी त्या उपयुक्त ठरू शकतात. इस्त्राईल आणि नेदरलँड्समध्ये यासंदर्भात अनेक प्रकारचे संशोधन होत आहे. या देशांनी कोरोना विषाणुचे संक्रमण रोखणाऱ्या अँटीबॉडी विकसित केल्या आहेत, असाही दावा केला आहे.
नेदरलँड्स..
वैज्ञानिकांनी मोनोक्लोनल अँटीबॉडी विकसित केले असून जे नव्या कोरोना विषाणुला प्रयोगशाळेत नष्ट करण्यात यशस्वी ठरले आहे. कोरोना विषाणु रोखणे आणि त्याच्या उपचारावरील दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
नेचर कम्युनिकेशन्स मासिकात छापलेल्या शोधानुसार प्रायोगिक अँटीबॉडी एकट्याने किंवा इतर औषधांच्या साथीने कोविड-१९ रोखण्यास किंवा त्यावर उपचार करण्यास मदत करते. नेदरलँड्सच्या युट्रेक्ट विद्यापीठाच्या बेरेंड जॉन बॉश आणि त्यांच्या सहकार्यांनी शोधनिबंधात लिहिले आहे की यावर अजून संशोधन होणे बाकी आहे. त्यानंतर प्रायोगिक अँटीबॉडी चिकित्साशास्त्रीय चाचणीत कसे काम करते, त्याची माहिती मिळेल.
प्रायोगिक अँटीबॉडीला ४७ डी ११ या नावाने ओळखले जाते. कोरोना विषाणुच्या पृष्ठभागावरील अणकुचीदार टोक असलेल्या प्रोटिनवर ते हल्ला चढवते. विषाणुच्या याच प्रोटिनच्या सहाय्याने तो मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो.
युट्रेक्ट विद्यापीठातील या संशोधनात अँटीबॉडीने कोविड-१९ चा प्रसार करणार्या कोरोना विषाणु आणि सार्सचा प्रसार करणार्या विषाणुला नष्ट केले आहे.
इस्त्राईल..
इस्त्राईलचे संरक्षणमंत्री नेफताली बेनेट यांनी सांगितले की इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायॉलॉजिकल रिसर्चने कोरोना विषाणुसाठी अँटीबॉडी विकसित करण्यात यश प्राप्त केले आहे. त्यांनी सांगितले की इस्राईलने जी अँटीबॉडी बनवली आहे, ती कोरोना विषाणुला शरिरातच नष्ट करू शकते. कोरोना विषाणू लसीचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे आणि संशोधक आता त्याचे पेटंट आणि व्यापक प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी तयारी करत आहे.
इटली..
इस्राईलच्या घोषणेनंतर एक दिवसाने इटलीनेही असा दावा केला आहे की त्यांनी कोरोना विषाणुसाठी लस तयार केली आहे.अहवालाच्या अनुसार, याला जोडलेले संशोधन रोम स्थित स्पँलंझनी रूग्णालयात सुरू आहे. संशोधक उंदरांमध्ये अँटीबॉडी विकसित करण्यात यशस्वी झाले आहेत. ही अँटीबॉडी मानवी पेशींवर काम करत आहे.