यवतमाळ - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात बुडून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. विष्णू चंदू टेकाम (23) असे मृताचे नाव असून, तो बरबडा येथील राहणारा होता. 3
मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे निळोणा धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत. या ठिकाणी अनेक नागरिक येऊन पोहण्याचा आनंद लुटतात. आज बरबडा या गावातील विष्णू टेकाम हा आपल्या मित्रांबरोबर धरणावर आला होता. धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला असता, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला.
आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली. पण, त्याचा शोध लागला नाही. घटनेची माहिती वडगाव पोलीस ठाण्याला मिळताच निळोणा धरणात त्याचा शोध घेणे सुरू केले. अखेर त्याचा मृतदेह सायंकाळच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.