यवतमाळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर दुसरीकडे, अनेक प्राण्यांची अवस्था त्यापेक्षाही बिकट आहे. आज मनुष्यासाठी विविध सामाजिक संघटना तसेच सरकार मदतीला धाऊन आले आहे. मात्र, मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांना उपासमारी सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच शहरातील चार तरुणांनी मोकाट प्राण्यांसाठी फिरता चारा डेपो सुरू केला आहे.
निलेश ठाकरे तसेच मंगेश ठाकरे हे दोघेही व्यवसायाने कंत्राटदार आहे. निलेश रापर्तीवार हे फॅशन बुटीकचा व्यवसाय करतात तर, सचिन मगरंदे हे जाजु कॉलेजमध्ये कार्यरत आहे. कोरोनामुळे शहरात मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांचे हाल होत असल्याची बाब या चौघांच्याही लक्षात येताच त्यांनी मोफत फिरता चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला. या चौघांनी 10 एप्रिलपासून शहरातील मोकाट प्राण्यांना चारा देणे सुरू केले. एका पिकअप व्हॅनमध्ये हिरवा चारा भरुन हे चौघेही सकाळीच शहरात मोकाट प्राण्यांचा शोध घ्यायला सुरुवात करतात. प्राणी दिसेल तिथे गाडी थांबवून त्यांना चारा देतात. याशिवाय मोकाट फिरणाऱ्या श्वानांनाही बिस्कीट खाऊ घालतात.
या उपक्रमासाठी ते १ हजार ६०० रुपयाचा चार क्विंटल हिरवा चारा विकत घेऊन रोज प्राण्यांना खाऊ घालत आहेत. तसेच, श्वानांसाठी ४०० रुपयांचे बिस्कीट विकत घेऊन खाऊ घालत आहेत. उमरसरा, लोहारा, वडगाव, पिंपळगाव, भोसा, लोखंडी पुल अशा शहरातील सर्वच भागात फिरुन ते प्राण्यांना चारा, बिस्किटे खाऊ घालत आहेत. संचारबंदी संपेपर्यंत हा उपक्रम सुरुच ठेवण्याचा निर्धार केला असल्याचेही या तरुणांनी यावेळी सांगितले.