यवतमाळ - जिल्ह्यात आतापर्यंत तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात उमरखेड तालुक्यातील एका महिलेचा 30 मे रोजी मृत्यू झाला. तर मूळचे वडाळा रोड, नाशिक येथील रहिवासी असलेले 60 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती हे नेर जवळ ट्रकमध्ये मृत आढळले. त्यांचा मृत्यू 1 जून रोजी झाला होता. तसेच महागाव येथील व्यक्तीचा (वय 40) 1 जून रोजी रात्री मृत्यु झाला असून तो 31 मे रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती झाला होता. त्याला दोन दिवसापासून श्वसनाचा आणि 15 दिवसांपासून ताप आणि खोकल्याचा त्रास होता.
त्याचप्रमाणे मुळचा आरंभी, (ता. दिग्रस) येथील रहिवासी असलेला व मुंबईवरून यवमाळ येथे उपचारासाठी रुग्णवाहिकेने येणाऱ्या रुग्णाचा 30 मे रोजी वाटेतच मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. सद्यस्थितीत जिल्ह्यात 36 पॉझिटिव्ह रुग्णांवर आयसोलेशन वार्डात उपचार सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यांत आतापर्यंत तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी 2 हजार 70 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 106 पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत 1 हजार 942 अहवाल निगेटिव्ह आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 12 तर गृह विलगीकरणात 441 जण आहेत.