जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना वेळेत समन्स बजावूनही न्यायालयात अहवाल सादर न झाल्याने, सोमवारी यावल न्यायालयाने दमानिया यांना पुन्हा समन्स बजावले आहे. यानुसार आता १८ मार्च रोजी स्वत: जामिनासह हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात दमानिया यांच्याविरुद्ध यावल न्यायालयाने १९ जानेवारीला प्रोसेस इश्यू करून १८ फेब्रुवारीला स्वत: जामिनासह हजर राहण्याचे आदेश दिले होते.
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी नगरसेवक अतुल पाटील यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी २८ नोव्हेंबर २०१८ रोजी पूर्ण होऊन यावल न्यायालयाने अंजली दमानियांविरुद्ध प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश दिले होते. तर १९ जानेवारीला यावल न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश विभा धुर्वे यांनी दमानिया यांना समन्स जारी केले होते.
या प्रकरणी न्यायालयाने १८ फेब्रुवारीला यावल न्यायालयात उपस्थित राहून जामीन देण्याचा आदेश दिला होता. मात्र, दमानिया परदेशात गेलेल्या असल्याने त्यांच्या मुंबईतील पत्त्यावर समन्स बजावूनदेखील यावल न्यायालयाला याबाबतचा अहवला अद्याप प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे तक्रारदार अतुल पाटील यांच्यातर्फे अॅड. गोविंद बारी यांनी सोमवारी न्यायालयाकडे पुन्हा समन्स काढण्याची मागणी केली. त्यानुसार पुन्हा एक महिन्याची मुदत देत अंजली दमानिया यांना १८ मार्च रोजी सक्षम जामिनासह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश समन्सद्वारे देण्यात आले आहेत.
