यवतमाळ - उमरखेड पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सदानंद वॉर्डा येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून अनेक प्रतिष्ठित बडे व्यापारी, नांदेड येथील प्रतिष्ठित नागरिक यांना जुगार खेळताना रंगेहात अटक केली. पोलिसांनी या कारवाईत तब्बल 38 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच 9 लाख 38 हजार 970 रुपये रोख रकमेसह तब्बल 47 लाख 34 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. उमरखेड येथील सदानंद वॉर्डातील नितीन बंग याच्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार जैन यांच्या पथकाने तिथे धाड टाकली. त्यावेळी तिथे नांदेड, उमरखेड येथील 38 प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व इतर लोक जुगार खेळताना आढळून आले.
हेही वाचा... स्पेशल : दोन्ही पाय निकामे तरी आर्थिक संकटात उभारी घेत कुटुंबाला सावरले; रिक्षा चालकाची प्रेरणादायी कहाणी
पोलिसांनी या कारवाईत 9 नऊ लाख 38 हजार 970 रुपये रोख रक्कम, 65 मोबाईल, 4 मोटर सायकल, 3 चारचाकी वाहने याशिवाय इतर साहित्ये, असा एकूण 47 लाख 34 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या 38 आरोपींविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मागील अनेक दिवसापासून नितीन बंग याच्या घरी मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी लोक येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तर लॉकडाऊनच्या काळात नांदेड येथील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक तिथे जुगार खेळायला येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या प्राप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, रेवन जागृत, उदयराज शुक्ला, प्रकाश चव्हाण, छगन चंदन, मोहन चाटे वसीम शेख, युनुस भातनासे, भावना पोहूरकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.