यवतमाळ - वनी येथे सॅनिटायझर प्राशन केल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी मृतकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. सॅनिटायझर पिल्याने 24 तासांत सहा जणांचा मृत्यू होणे ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचेही यावेळी ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - यवतमाळमध्ये शनिवारी नवीन 1163 जणांना कोरोना, 20 मृत्यू
ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्या प्रत्येक घरी जाऊन भुजबळ यांनी घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाचा आढावा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक वैभव जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. भालचंद्र आवारी यांच्याकडून घेतला.
त्या मृतकांच्या घरी दिली पोलीस अधीक्षकांनी भेट
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंद आहेत, त्यामुळे दारूची गरज भागविण्यासाठी सॅनिटायझर पिल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश शेलार, संतोष मेहर, सुनील ढेंगळे यासह एका व्यक्तीचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला होता.
सॅनिटायझरमधील अल्कोहोल आरोग्य रक्षणासाठी - पोलीस अधीक्षक भुजबळ
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो. यात 70% अल्कोहोल असते. हे अल्कोहोल केवळ आरोग्याच्या रक्षणासाठी आहे, त्याचे प्राशन करणे हे अतिशय धोकादायक आहे. ते पिणे योग्य नाही, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी केले.
हेही वाचा - जीएमसी मृतदेह बेपत्ता प्रकरण; ढोकणे कुटुंबीयांनी उपोषण घेतले मागे