यवतमाळ Yavatmal Massacres : घरगुती वादातून घर जावयानं आपल्या पत्नीसह सासरा, सासू आणि दोन मेहुण्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरझडा या गावात घडली आहे. आरोपी घरजावई गोविंदा बिरजूचंद पवार (४०, रा.कळंब) याला पोलिसांनी रात्रीच अटक केली. मुलीला त्रास देतो म्हणून पत्नीच्या माहेरच्या लोकांनी गोविंदाला मारहाण केली होती. त्याचा राग मनात ठेवून त्यानं या चौघांना संपविल्याचं पोलीस तपासात पुढं आलं आहे.
पाच जणांची हत्या केली : गोविंदा पवार यानं आधी सासरे पंडीत घोसले (५५), मेहुणे नाना घोसले (३२) आणि सुनिल घोसले (२५) यासह पत्नी रेखा पवार (३०) यांची हत्या केली. तर सासू रुख्मा घोसले या गंभीर जखमी होत्या. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. अशाप्रकारे या घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जावयाला मारहाण : काही दिवसापूर्वी सासरे पंडीत घोसले आणि जावई गोविंदा पवार यांच्यात वाद झाला होता. मुलीला त्रास देण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली होती. त्यावेळी जावई गोविंदा पवारला मारहाण करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही काही दिवस सर्व सुरळीत सुरू होतं. आरोपी गोविंदा पवार हा कळंबचा रहिवाशी असला तरी तो मागील एका महिन्यापासून सासऱ्याच्या घरी तिरझडा येथे राहत होता. मात्र त्याच्या मनात पत्नीच्या माहेरच्यांनी मारहाण केल्याचा राग होताच.
मारहाणीच्या रागातून पाच जणांची हत्या : मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपी गोविंदा शेतात मेहुणा सुनिलसाठी जेवणाचा डब्बा घेऊन गेला. त्याच्यासोबत पत्नी रेखाही होती. तेथे गोविंदानं सुनिल घोसले आणि पत्नी रेखाच्या डोक्यावर सबलीचे वार करुन त्यांना जागीच ठार केलं. या दोघांना मारल्यानंतर तो घरी परत आला. यानंतर त्यानं घरात झोपेलेले सासरे पंडीत आणि मोठा मेहुणा नाना यांच्या डोक्यावर आणि मानेवर सबलीनं वार केले. यात ते दोघंही जागीच ठार झाले. या दरम्यान सासू रुख्मा जाग्या झाल्या. त्यानंतर गोविंदानं त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा :