यवतमाळ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे आता राजकाणाच्या आखाड्यात उतरत आहेत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून त्या प्रहार संघटनेकडून लढतील. इतर मतदारसंघातही शेतकऱ्यांच्या विधवांना उमेदवारी देणार असल्याचे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चु कडू यांनी सांगितले.
यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण अचानक रद्द करण्यात आले. त्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना हा मान देण्यात आला. यामुळे वैशाली येडे यांचे नाव सर्वपरिचीत झाले. संमेलनात भाषण करून त्यांनी लोकांची वाहवा देखील मिळवली होती. आता त्याच वैशाली येडे निवडणूक लढवणार आहेत.
यवतमाळ-वाशिम या मतदारसंघात बच्चु कडू यांच्या प्रहार संघटनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या विधवांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, असे बच्चु कडू म्हणाले. या महिला कष्टकरी समाजाचे नेतृत्व करतील. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी उमेदवारी दिल्याचे बच्चु कडू यांनी सांगितले.
इतर ठिकाणीसुद्धा शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना उमेदवारी देण्यासंबंधी विचार सुरू असल्याचे बच्चु कडू म्हणाले. यवतमाळमधून येडे यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे आणि भाजपच्या भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असे बोलले जात आहे. या उमेदवारीला यवतमाळकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.