यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या कोणत्याही सवलती यवतमाळमध्ये सुरू होणार नाहीत, असे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिले.
२० एप्रिलपासून राज्यातील ग्रीन झोन असलेल्या काही जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून नवीन आदेशानुसार कोणत्याही सवलती लागू करण्यात आलेल्या नाही. नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत नियम पाळावे लागणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येत नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर निघता येत आहे. जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. त्यात कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने शिथिलता देण्यात आलेली नाही.