यवतमाळ - आगामी काळात मान्सूनचे आगमन लक्षात घेता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. 'मान्सून कालावधी लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी मान्सूनपूर्व सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. पूरप्रवण गावांची माहिती घ्या. मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढा. पूरप्रवण भागातील नैसर्गिक जलाशयांची साफसफाई करा. त्यातील गाळ काढा', असे निर्देश यावेळी देण्यात आले.
'धरणावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करा'
'नदीकाठावरील बंधाऱ्यांची, साठवण तलावाची पाहणी करणे आणि गरज असल्यास त्यांचे बळकटीकरण करणे. डागडूजी करणे इत्यादी कामे मान्सूनपूर्व करावीत. सर्व प्रमुख धरणांवर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. त्यांची माहिती सर्व नियंत्रण कक्षास उपलब्ध करून देण्यात यावी. पावसाचे प्रमाण व धरणातील पाण्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे. धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल सावधगिरीचा इशारा देण्यात यावा. धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी कमीतकमी 5 ते 6 तास अगोदर सूचना द्यावी. पाणी सोडण्याबाबत संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे. पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणाऱ्या औषधांचे पूर्व नियोजन करणे', अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
हेही वाचा - पी-305 बार्ज : दुर्घटनेला बार्जचा कॅप्टन जबाबदार; कर्मचाऱ्याचा आरोप