यवतमाळ- रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यातील हळवा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधून त्याच्या उन्नतीसाठी प्रार्थना करते. दारव्हा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला. बँकेत आलेल्या ग्राहकांना राखी बांधून मास्क भेट देत अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे. बँकांमध्ये ग्राहकांची गर्दीही कमी असते. आज दारव्हा येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या ग्राहक बांधवांना राखी बांधून मास्क भेट देवून काळजी घेण्याचे प्रेमळ आवाहन केले.
जिल्हा बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी कोरोना संदर्भात जनजागृती केली. ग्राहकांनी सुद्धा याला सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक प्रबोधन करणारे हे अनोखे रक्षाबंधन चर्चेचा विषय ठरला. या उपक्रमामध्ये बँक कर्मचारी संजिवनी घुरडे, वृषाली खंडारे, पूजा शेळके, मंजु गुघाने, अंकिता रवाळे, ज्योती भांगे, बेबी राठोड यांनी सहभाग घेतला.