यवतमाळ - आज काम बंदचा चौथा दिवस आहे. कोविड-19 ची साथ आल्यापासून आपण सर्वांनी मनापासून लोकसेवा दिली आहे. सर्वांच्याच प्रयत्नामुळे आपण बहुतांश शहरी आणि ग्रामीण भागात करोनाला दूर ठेवू शकलो. तसेच मृत्यूदर देखील कमी ठेवू शकलो. कळत-नकळपणे माझ्या काही शब्दांमुळे आपल्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी मनापासून त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली.
वैयक्तिक हेवे-दावे न ठेवता मी नेहमी जनहित समोर ठेवून काम केले आहे. आजपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मी एकाही डॉक्टरवर कारवाई केली नाही. तसेच कोणाचे भवितव्य धोक्यात येईल, अशी कोणतीही लेखी कारवाई केलेली नाही, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणामध्ये राहावा यास प्राधान्य दिले आहे. शासन स्तरावरून वेळोवेळी येणारे निर्देश काटेकोरापणे पाळले जावे, या करिता कडक भूमिका घेतली असेल इतकेच. आपल्यामधील संवाद व्यवस्थित न झाल्यामुळे आणि सर्वांना असणाऱ्या तणावामुळे गैरसमज झाला असेल याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - जनतेसाठी डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावे, पालकमंत्री संजय राठोड यांचे आवाहन
या संकटाच्या काळात आपले सर्वांचे महत्त्व वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. सर्व यंत्रणानी मिळून काम केले तरच आपण एकजूटपणे आलेल्या या कोरोनाला हरवू शकतो, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काम बंदमुळे जनसामान्यांची गैरसोय होऊ नये, अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो. आपण सर्वांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती डॉक्टरांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज केली आहे.
हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांची बदली केल्याशिवाय माघार नाही; राज्यभर आंदोलनाचा इशारा