यवतमाळ - लॉकडाऊनमध्ये महिलांचा रोजगार संपला. मजुरांना बेरोजगार म्हणून जगण्याची वेळ आली असतांना महिलांच्या वाट्याला पुरुषांच्या पेक्षा जास्त अडचणी आल्यात. त्यामुळे फक्त शासकीय उपाययोजनांवर अवलंबून न राहता जिल्ह्यातील महिलांनी एकत्र येत गृह उद्योगाला चालना दिली आहे. त्यासाठी त्यांनी कारभारणी नावाने मंचची स्थापना केली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या संकल्पनेतून या महिला आता आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत आहेत.
लघु उद्योगातून महिलांना स्वयंपूर्ण करणे
लघु उद्योगाला चालना मिळवी महिलांना स्वयंरोजगार, विविध उद्योगाचे प्रशिक्षण, मार्केटिंग स्कील, उद्योगासाठी कर्ज, तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सहली, विविध स्पर्धा असे बहुआयामी उपक्रम 'कारभारणी' या मंचतर्फे राबविण्यात येणार आहेत.
कारभारणीच्या लोगोचे अनावरण-
विविध क्षेत्रामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांनी स्वतः कारभारणीच्या लोगोचे अनावरण केले. यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला शेतकरी, नगर परिषद सदस्य, परिचारिका, शिक्षिका, समाज संघटक, बचत गट सहयोगीनी, लघु उद्योजीका, सफाई कामगार, दुकानदार, भाजीविक्रेते, घरकाम करणाऱ्या स्त्रिया अशा जवळपास तीन हजार स्त्रियांचा समावेश यात आहे.