यवतमाळ - शेतात निंदन (खुरपणी) करत असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. पांढरकवडा तालुक्यातील अंधारवाडी गावात ही घटना घडली. लक्ष्मी दडांजे (वय 55) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. यामुळे अंधारवाडी आणि लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लक्ष्मीबाई दडांजे ही आज दुपारी आपल्या शेतामध्ये निंदन करत होती. पाठीमागून अचानक वाघाने लक्ष्मी यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केल्याने शेतातील मजूर त्यांच्या मदतीसाठी धावून आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोंकने व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीकडे धाव घेतली. या घटनेची दखल घेऊन वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी 20 जणांची रेस्क्यू टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
पांढरकवडा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या पाटणबोरी सर्कलमधील अंधारवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर आहे. आतापर्यंत या परिसरातील गाय, बैल, बकरी अशा आठ ते दहा जनावरांची त्याने शिकार केली आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी 7 ऑगस्ट रोजी अंधारवाडी व परिसरातील गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची वाहने गावकऱ्यांनी अडवली होती.
दोन वर्षांपूर्वी पांढरकवडा वनविभागाच्या भागात अवनी (टी-वन) वाघीणीने 13 शेतकरी व मजूरांना ठार केले होते. त्यानंतर तिला ठार करण्याचे व तिच्या दोन बछड्यांना पकडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दोन वर्षानंतर पुन्हा पांढरकवडा वनविभागात वाघाने धुमाकुळ घातल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.