यवतमाळ- विदर्भातील पहिली आदिवासी सहकारी सूतगिरणी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील देवधरी या ठिकाणी उभी राहणार आहे. या गिरणीच्या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे. आदिवासी सहकारी सूतगिरणी उभी करताना शासनाकडून ४५ टक्के रक्कम मिळाली. आदिवासी विभागाकडून ५० टक्के तर ५ टक्के रक्कम ही ३०० आदिवासी शेतकऱ्यांना भागधारक करून घेण्यात आली आहे.
या सूतगिरणीसाठी कुठल्याही बँकेचे कर्ज घेण्यात आले नाही. सूतगिरणीला आदिवासी विकास विभागाकडून बिन व्याजी रक्कम देण्यात आली आहे. सुतगिरणीतून २४ हजार स्पेनडलची निर्मिती होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याचा कापसाला चांगला दर मिळणार आहे. शिवाय राळेगाव, कळंब आणि बाभूळगाव या तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याचे सूतगिरणीचे अध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा- यवतमाळमध्ये 2 वळूंची दहशत; नगरपालिकेची बघ्याची भूमिका
अलीकडे जिल्ह्यातील सूतगिरण्या बंद पडल्या आहे. बंद पडलेल्या सूतगिरण्या बँकेच्या कर्जामुळे चालविता आल्या नाही. मात्र आदिवासी सहकारी सूतगिरणीसाठी आम्ही कुठल्याही बँकेचे कर्ज घेतले नसल्याने ही सुतगीरणी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही अग्रेसर राहणार असल्याचा विश्वास उईके यांनी व्यक्त केला आहे.