यवतमाळ - शिवसेना नेते प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली यावर यात कसली मर्दानगी, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. यावर उत्तर देताना कंगणाचे ऑफिस पाडले तेव्हा त्यामध्ये कोणती मर्दानगी होती, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार प्रा. डॅा. नितीन धांडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रवीण दरेकर हे यवतमाळ येथे आले असता ते पत्रकारांशी बाेलत होते.
ही तर सेनेची सवयच-
काहीही झाले की भाजपावर आणि केंद्रावर ढकलण्याची शिवसेनेला सवयच झाली आहे. केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा शिवसेनेकडून वापरली जात आहे. कंगना राणावत हीच्या ऑफिसवर महापालिकेने जेव्हा सूडबुद्धीने कारवाई केली, तेंव्हा या कारवाईचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. मग आता प्रताप सरनाईक यांची ईडीने रुटीन चौकशी केली, तर त्याचा भाजपाशी कसा काय संबंध आहे, असाही प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच ईडीसारख्या तपास यंत्रणेवर चिखलफेक करणे उचित नाही. माध्यमे आणि विरोधी मत मांडणाऱ्या सर्वसामान्यांना जेलमध्ये टाकताना, कुणी-कुणाला स्वपक्षाच्या शाखेप्रमाणे वागवले होते, याचाही विचार सेनेने करावा, असेही दरेकर म्हणाले.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा-
दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचाराच्या घटना दर दिवशी होत आहेत. क्वारांटाईन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलाही सुरक्षित नाही. ठाण्यामध्ये जमील नावाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा हत्या झाली. गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचा धाक, दरारा उरला नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली.