यवतमाळ - मारेगाव तालुक्यात कोणत्याच गावात दुष्काळ नसल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. मात्र, या तालुक्यातील डोंगर कपाऱ्यांत वसलेल्या गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथील असंख्य गावे तहानलेलीच असल्याचे वास्तव समोर आले आहे.
मारेगाव तालुका आदिवासीबहूल तालुका असून यात ९६ गावे आहेत. त्यातील अनेक गावे डोंगर कपाऱ्यात वसलेली आहेत. गावातील पाण्याची भीषण टंचाई असून गावकरी कशीतरी व्यवस्था करून आपली तहान भागवत आहे.
तालुक्यातील करणवाडी गावात ७ हॅन्डपंप आहे. तर ४ विहिरी आहे. त्यापैकी ३ विहिरी पूर्णपणे आटलेल्या आहेत. तर एका विहिरीने तळ गाठला आहे. हॅन्डपंप शेवटच्या घटका मोजत आहे. या गावात कोणतीही नळ योजना नाही. त्यामुळे पाणी समस्येने भयावह रुप घेतले आहे. हे गंभीर रुप पाहून प्रशासनाकडून गावात नवीन बोरवेल मारण्यात येत आहे. अशीच स्थिती तालुक्यातील बिहाडी पोडची आहे. या गावातील नळ योजना गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
शासनाद्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीला पाणी नियोजनासाठी लाखो रुपये येतात. मात्र, त्याचे योग्य नियोजन नसल्याने दरवर्षी पाणी समस्या जाणवते. गावात पाणी समस्येची ओरड झाली, की थातूर मातुर पाण्याची व्यवस्था करुन वेळ मारुन नेली जात आहे, असा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. त्यांनी तालुक्यातील पाणी समस्या कायमची मिटवावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.