यवतमाळ - एप्रिल महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर आज यवतमाळ शहरातील बाजारपेठ उघडली. खरेदीसाठी व्यापारी आणि ग्राहकांनी दुकानात गर्दी केली. सामाजिक अंतराचा पार फज्जा उडाला. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, बाजारपेठेत कोणत्याही प्रकारचे नियम पाळण्यात आले नाहीत.
पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती -
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. दररोज दोन ते अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण निघत असल्याने जिल्हा प्रशासनाने 6 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी या आदेशात वाढ करण्यात आली होती. मात्र, आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही आता कमी झाल्याने बुधवारपासून निर्बंध उठवण्यात आले असून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्याचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक सेवा व इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत एकच गर्दी केली. यावेळी कुठल्याही प्रकारचे नियमाचे पालन करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात येत्या दोन-तीन महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.