यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एका छोट्याशा गहुली गावात वसंतराव नाईक यांचा 1 जुलै 1913 रोजी जन्म झाला. आपल्या कर्तृत्वातून पुरोगामी महाराष्ट्रात समृद्धी आणली. शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, किंबहुना त्यांच्या प्रगतीसाठी नाईकांनी आपले आयुष्य वाहून घेतले. महाराष्ट्राची धुरा पहिल्यांदा 5 डिसेंबर 1963 साली वसंतराव नाईक यांनी सांभाळली. महाराष्ट्र निर्मितीच्या कार्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वसंतराव नाईक यांच्यावर येऊन पडली.
संकटावर मात करून प्रगतीची वाट..
1972 चा दुष्काळ आणि भारतावर दोन वेळा आलेले युद्धाचे संकट, कोयनेचा भूकंप, अशी संकटांची मालिका झेलत वसंतराव नाईक यांनी संकटांना आव्हान समजून महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेले. दुष्काळाच्या काळात जनता अन्नाच्या कणास मोतास झाली होती. अन्नटंचाईमुळे सर्वत्र दाणादाण उडाली होती. या संकटाला सामोरे जाताना महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची वसंतरावांनी भीष्मप्रतिज्ञा घेतली. पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर भल्या मोठ्या सभेत त्यांनी घोषणा केली- "येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाहीतर जाहीरपणे फाशी घेईल', त्यांच्या या घोषना केली. यातून प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. केवळ संकरित वाण निर्मिती करून भागणार नाही तर शेतीचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे, यासाठी त्यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र चार कृषी विद्यापीठांची निर्मिती केली. हा निर्णय म्हणजे वसंतरावांच्या शेतीविषयक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सर्वोच्च कळस होता.
ठिबक सिंचन ही संकल्पना..
ठिबक सिंचन ही संकल्पना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी अमलात आणली. वसंतराव नाईक यांनी शेतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. केळी असो वा कापूस, ऊस असो वा अंगूर सर्वच पिकांचे प्रयोग त्यांनी आपल्या शेतीत केले आणि शेतकऱ्यांसमोर समृद्ध शेतीचा आदर्श समोर ठेवला. केवळ संकरित वाणाने उत्पन्न वाढविणे अवघड आहे. त्याच्या जोडीला कमी पावसात भरघोस उत्पादन देणारे बियाणे शोधणे, शेतीविषयक संशोधनाची गरज त्यांनी लक्षात घेतली. शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक शेतीतंत्रज्ञान पोचण्यासाठी राहुरी, अकोला, परभणी व दापोली ही कृषी विद्यापीठे आज चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड..
आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. वसंतराव नेहमी म्हणत "शेती पाण्याने भिजवा, पाणी नसेल तर घाम गाळा. श्रमातून शेती फुलेल.' कोरडवाहू शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी त्यांनी "पाणी अडवा, पाणी जिरवा' या मूलमंत्राचा पुरस्कार करून शेतात बांधबंदिस्ती, नाल्यावर बांध बांधून पाणी अडविण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. तसेच राज्यभर सिंचन व्यवस्था वाढीसाठी जायकवाडी महाप्रकल्प, उजनी, अरुणावती, इसापूर, पूस, अप्पर वर्धा, अशा सिंचन प्रकल्पांना उभारी दिली. गावोगावी शेततलाव, तळी व विहिरी खोदण्याचे काम हाती घेतले. यातून तुंबलेल्या पाण्यावर भरघोस पीक बहरले व शेती सुजलाम सुफलाम झाली.
जिल्हा परिषदांची निर्मिती..
पंचायतराजचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदांची निर्मिती केली. आज याद्वारे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन कल्याणकारी योजनांचा लाभ गावखेड्यापर्यंत पोचला आहे. दुष्काळाची भीषणता अनुभवताना त्यांनी शेतमजुरांच्या हातांना काम मिळेल यासाठी 'रोजगार हमी योजना' राज्याला दिली. खडीकरणातून रस्ते साकारले, तळी खोदल्या गेली, साचलेला तळ्यातील गाळ बाहेर आला आणि मुख्य म्हणजे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. ही योजना आता केंद्र सरकारने पुरस्कृत केली आहे. यातच त्यांच्या दूरदृष्टीचे गमक सहजतेने लक्षात येते. रोजगार हमी योजने सोबतच जिल्हा नियोजन वसंतरावांच्या दूरदृष्टीतून पुढे आले.