यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कापसी येथे पोलिओ म्हणून सॅनिटायझर पाजल्या प्रकरणात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. डॉ. भूषण मसराम, डॉ. महेश मनवर, असे निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.
राष्ट्रीय बालहक्क आयोगाला पाठविला अहवाल
घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कापसी येथील बारा बालकांना पोलिओ म्हणून सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणात सिएचओ डॉ. अमोल गावंडे, आशा संगीता मसराम, सविता पुसनाके यांच्यावर बडतर्फ कारवाई दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अशात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाला नोटीस पाठवली होती. त्यावरून प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पार पडली होती. भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर, डॉ. भूषण मसराम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल राष्ट्रीय बालहक्क आयोगाला पाठवण्यात येणार आहे.