यवतमाळ - भरधाव जात असलेल्या एसटी बस, टँकर व कंटेनरचा तिहेरी अपघात झाला. यात एसटी बस चालकासह चार जण गंभीर जखमी झाले. अन्य 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 21 जून) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील पारवा येथे घडली.
चालक प्रवीण सिडाम (वय 40 वर्षे, रा. आर्णी रोड, यवतमाळ), वाहक फुलसींग राठोड, अशोक ठाकरे (रा. पिंपरी), राजेंद्र मडावी, जोडमोहा नीलू बाई राठोड (रा. सावंगी दाराव्हा), भाऊराव जाधव (रा. सावंगी), अमोल चव्हाण (रा. केवापूर ), राधिका ढगे (रा. केळापूर), असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. या व्यतिरिक्त अन्य प्रवासी किरकोळ जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकवडा डेपोची एसटी बस क्रमांक ( एम एच 40 वाय 5245 ) ही यवतमाळहून पांढरकवडा येथे प्रवासी घेऊन जात होती. दरम्यान, पांढरकवडाकडून येत असलेल्या मिक्सर टँकर, कंटेनरची जोरदार धडक झाली. याच दरम्यान भरधाव बस चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरची व बसची धडक झाली. यामध्ये बस झाडावर जाऊन अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात एसटी चालकासह चौघे जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. भर पावसात हा अपघात घडल्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण झाला होता. तर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.
हेही वाचा - Sanjay Rathod Clinchit : आमदार संजय राठोड यांना क्लिनचिट; पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची केली मागणी