यवतमाळ - एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणसुध्दा लक्षणीय आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत 58 हजार 715 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. विशेष म्हणजे यातून तब्बल 50 हजार 299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याची ही टक्केवारी जिल्ह्यात 88.66 आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 7 हजार 17 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 58 हजार 715 झाली आहे. 24 तासात 991 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 50 हजार 299 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 399 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.07 तर मृत्यूदर 2.38 इतका आहे.
1 हजार 850 जणांचे लसीकरण
जिल्ह्यात 1 मे रोजीपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून मंगळवारपर्यंत एकूण 1 हजार 850 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील केंद्रावर 375 जणांचे लसीकरण, लोहारा येथील केंद्रावर 357, पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 367, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात 375 आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 376 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.