यवतमाळ - पूसद येथील शेबालपिंप्री रस्त्यावरील आमदार मनोहर नाईक यांच्या बंगल्यासमोरील वसाहतीच्या ठिकाणी अनधिकृत ३० गॅस सिलिंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी, निरीक्षण अधिकारी व्या.ना. रावलोक (पूसद) यांनी केली.
पूसद येथील शेबालपिंप्री रस्त्यावरील दिगंबर मारोतराव गुंजकर यांच्या जागेवरून कुठल्याही प्रकारची तहसील व गॅस एजन्सीची परवानगी न घेता गॅस सिलिंडरचा पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एस. भराडी यांना मिळाली. त्यावरून या ठिकाणी छापा टाकला असता एका शेडमध्ये ३० सिलिंडर आढळून आले. हा सिलिंडरचा साठा वैभव सुभाष अंनकुले (वय 25, रा. वाडी, ता.पुसद) यांच्याकडून जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला साठा हा गुंजकर एचपी गॅस एजन्सी (श्रीरामपूर) यांचा असून ते कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता या ठिकाणावरून ग्राहकांना वितरित करीत होते. जप्त करण्यात आलेले सिलिंडरचा पूसद तहसील कार्यालयात ठेवण्यात आले असून एचपी गॅस कंपनीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.