यवतमाळ - झरिजामणी तालुक्यातील टाकळी गावात खुनी नदीतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, येथील पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी नदीची पाहणी केली. यावेळी त्यांना पाण्यामध्ये घातक रसायन आढळले.
कर्मचाऱ्यांनी याची कल्पना सरपंच आणि सचिव यांना दिली. यावेळी नदीतील पाण्याची पाहणी करत विस्तार अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पांढरकवडा येथील लॅबमध्ये पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर पाण्यात कोणती रसायने आहेत, याची माहिती मिळणार आहे. गावातील पाणीपुरवठा काही दिवस बंद करण्यात येईल याची माहिती गावात देण्यात आली. यावेळी टँकरद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती टाकळीच्या सरपंचांनी दिली आहे. यासंबंधातील माहिती गट विकास अधिकारी, तहसिलदार तसेच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी नदीची पाहणी केली. अधिकाऱयांनी चौकशी करुन यासंबंधी दोषींवरती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच संदिप बुर्रेवार यांनी केली आहे.
नदीद्वारे परिसरातील दाभा, डोर्ली, सतपली, सुर्दापुर, दिग्रस, कमळवेली तसेच काही गावांना सुध्हा पाणी पुरवठा होतो. यागावातील सरपंचांना याबाबत कळवण्यात आले आहे.