यवतमाळ - जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर व मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी गांभीर्याने सर्व्हे करून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा त्वरीत शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधितांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करणे, याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेने अतिशय गांभीर्याने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. गुरुवारी त्यांनी वणी, पांढरकवडा आणि मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांची पाहणी केली.
रुग्णांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न -
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तसा आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. 30 लाख लोकसंख्येचा भार जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालय सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणि 17 खासगी कोविड हॉस्पिटलवर आलेला आहे. मात्र, ही आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असून सर्व रुग्णालय पूर्णपणे फुल झाले आहे. रुग्णांना उपचारासाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून बेड मिळेना, अशी परिस्थिती रुग्णांची झालेली आहे. यामुळे प्रशासन आता कोरोना रुग्णांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करत आहेत.
ऑक्सिजनची पुर्तता करावी -
जिल्ह्यातील शासकीय आणि ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची पाहणी करत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य ते निर्देश दिलेे. दरम्यान, वणी येथे डेडिकेटेड कोविड हेल्थकेयर सेंटर नुकतेच सुरू करण्यात आले असून येथील सोयीसुविधा, उपलब्ध वैद्यकीय स्टाफ आदींबाबत इत्यादी सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी पाहणी केली. प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे 16 नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वणी ते यवतमाळ हे अंतर फार लांब आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला यवतमाळ येथे स्थलांतरीत करावयाचे असल्यास रुग्णवाहिका येईपर्यंत संबंधित रुग्णाला ऑक्सिजनची पुर्तता करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यानंतर पालकमंत्र्यांनी करंजी येथील ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय, पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच तेथील परिस्थिती जाणून घेतली.