यवतमाळ - शाळकरी विद्यार्थ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याची घटना आज पोफळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भांबरखेडा शिवारात उघडकीस आल्याने खळबळ उडाली. संतोष शंकर डांगे (वय 14, रा. लासीना, जि. हिंगोली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
कळमनुरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या लासीना येथील संतोष डांगे हा विद्यार्थी सोमवारी सकाळी 8 वाजता शाळेत जाण्यासाठी घरून गेला. सायंकाळी उशीरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे पालकांनी कळमनुरी पोलीस ठाणे गाठून अपहरणाची तक्रार दिली. नातेवाईक व पोलिसांनी रात्रभर विद्यार्थ्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.
हेही वाचा - यवतमाळ: सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरी पाच लाखांची चोरी
भांबरखेडा शिवारातील रस्त्याच्या बाजूला दुरसंचार विभागाचे केबल टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका मुलाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला. त्यावेळी पोफाळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास भगत यांनी पथकासह घटनास्थळ गाठत वरिष्ठांना ही माहिती दिली.
हेही वाचा - महाविकास आघाडी अपवित्र, जास्त दिवस टिकणार नाही - हंसराज अहीर
उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. यवतमाळ येथील लुसी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोफाळी पोलिसांनी अनोळखी मारेकर्याविरुद्घ गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा कळमनुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मृतदेह जमिनीत गाडला होता. त्यामुळे उमरखेड व पुसद महसूल विभागाच्या अधिकार्यांसमोर मृतदेह खड्ड्याबाहेर काढण्यात आला. विद्यार्थ्याचा खून कोणी व का केला? याचा उलगडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.