यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालात मोबाईलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेत मास कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलद्वारे प्रात्यक्षिक परीक्षेत मास कॉपी केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र वैद्यकीय प्रशासनाकडून या बाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११ ते १८ जानेवारी दरम्यान वैद्यकीय पदवीची परीक्षा घेण्यात अली. यावेळी रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान करून त्यांच्यावर करावयाच्या उपचारा संदर्भात प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची परीक्षा वॉर्ड क्रमांक १० व ७ मध्ये घेतली जात होती. मात्र या ठिकाणी परीक्षेला बसलेले बहुतांश विद्यार्थी मोबाईलच्या माध्यातून बिनधास्तपणे प्रात्यक्षिक सोडवत असल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्याला प्रतिबंध आहे. तरीसुद्धा हा सगळा प्रकार खुलेआम सुरु होता. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रत्येक वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शिवाय परीक्षा सुरु असताना रूममध्ये पूर्णवेळ परिवेक्षक उपस्थित असतात. तरीसुद्धा सर्रासपणे सामूहिक कॉपीचा प्रकार सुरु होता.
परीक्षेमध्ये मोबाईलच्या माध्यमातून सामुहिक कॉपी सुरु असल्याचा प्रकार एका नागरिकांच्या लक्षात येताच त्याने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला आहे. या गंभीर प्रकाराबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, कोणीही बोलण्यास टाळाटाळ करत होते.