यवतमाळ - भाजपचे बंडखोर उमेदवार परशुराम आडे यांच्या प्रचारासाठी मराठी सिनेतारका सोनाली कुलकर्णीचा 'रोड शो' आयोजित करण्यात आला. यावेळी तिला पाहण्यासाठी यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली. शहराच्या विविध भागातून हा रोड शो करण्यात आला.
यावेळी भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी.आडे यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर टीका करताना मागील २० वर्षांपासून त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. यावर मतदार नाराज आहे, म्हणूनच भाजपातून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली असल्याचे म्हटले. यासोबतच भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये जे माझे हितचिंतक आहेत आणि जनतेबद्दल ज्यांना आपुलकी आहे, अशा सर्व लोकांचा मला पाठिंबा असल्यामुळे मी उमेदवारी दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षाला जर योग्य वाटत नसेल तर ते माझ्याबद्दल निर्णय घेतील. पण मी घेतलेला निर्णय हा जनतेसाठी असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. यवतमाळ आणि वाशीम हे दोन्ही जिल्हे विकासाच्या बाबतीत मागे असून दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी उमेदवारी दाखल केल्याचेही ते बोलले.