यवतमाळ- पांढरकवडा तालुक्यातील उमरी ग्रामपंचायत कार्यालयात शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके होते. यावेळी त्यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
इमारत व इतर कामगारांना सुरक्षा किटचा लाभ मिळावा. या उद्देशाने राळेगाव विधासभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या विविध गावांमधील कामगारांची नोंदणी करण्यात आली. सुरक्षा किटचा लाभ मिळावा म्हणून कामगारांनी उमरीच्या ग्रामपंचायती मध्ये मोठी गर्दी केली होती.यावेळी जवळपास 500 कामगारांना किटचे वाटप करण्यात आले.
रविवारी सकाळ पासून कार्यक्रमाच्या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ज्या कामगारांना नोंदणी साठी अडचणी येत होत्या त्यांना मार्गदर्शन करून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. त्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचेसह केळापूरचे तहसीलदार सुरेश कवाळे, बांधकाम मंडळाचे पी. एन. कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शंकर समृतवार, उमरीचे सरपंच वसंत राठोड, महादेव ठाकरे, अक्कलवार प्रामुख्याने उपस्थित होते.