यवतमाळ - गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या, अखेर शाळा सुरू करायला परवानगी दिल्यानंतर आज यवतमाळ जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यात एकूण 600 शाळा उघडण्यात आल्यात. दरम्यान जिल्ह्यातील 3 हजार 397 शिक्षकांपैकी 2 हजार 600 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील 81 शिक्षक कोरोनाबाधित असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात 9 वी ते 12 वी पर्यंतचे दीड लाख विद्यार्थी
जिल्ह्यात एकूण 771 शाळा असून, शिक्षकांची संख्या 3 हजार 397 आहे. तर 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या दीडलाख आहे. इयत्ता 9 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 89 हजार 988 आहे, तर 11 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 59 हजार 797 इतकी आहे. विद्यार्थ्यांंची संख्या लक्षात घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पालकांचे संमतीपत्र आवश्यक
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. पालकांची संमती असेल तरच विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव अद्यापही कायम असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्याला संमतीपत्र दिले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.