यवतमाळ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निवडून येताच आणि उपाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडताच वनी येथील संजय दरेकर यांनी भगवा खांद्यावर घेतला. आज पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी शिवबंधन बांधून संजय देरकर यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश घेतला.
हेही वाचा - आधी पीक कर्जाचे व्याज भरा, नंतर शासन देणार थेट भरपाई
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळेच शिवसेनेकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक पदासाठी संजय देरकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अधिकृतपणे प्रवेश घेतला नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदही सांभाळले
वनी येथील संजय दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदाची सुत्रेही सांभाळली होती. मात्र, मध्यंतरी तीन-चार वर्षापासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. तर, गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष उभे राहिले होते. तर, विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून दावेदारी दाखल केली होती. मात्र, यावेळी शिवसेनेचे संजय राठोड यांनी मध्यवर्ती बँकेवर शिवसेनेकडून उमेदवारी देणार, असा शब्द दिल्याने ते आता शिवसेनेत दाखल झाले आहेत.
वनी गटबाजीचे होण्याचे संकेत
वनीमध्ये माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून कधी राष्ट्रवादी, तर कधी अपक्ष म्हणून संजय दरेकर हे त्यांच्यासमोर उभे होते. मात्र, आता त्यांचाच शिवसेनेत प्रवेश झाल्याने वनीमध्ये शिवसेनेत गटबाजी होणार असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचेही ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे, संजय देवकर यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे शिवसेनेला खरोखरच आगामी नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा होईल की, शिवसेनेत गटबाजी उफाळून येईल, असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.
हेही वाचा - आधी पीक कर्जाचे व्याज भरा, नंतर शासन देणार थेट भरपाई