यवतमाळ : जिल्ह्यातील झरीजामणी, पांढरकवडा, मारेगाव, तसेच इतर आदिवासीबहुल भागातील कुमारी मातांचा पुनर्वसनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. या महिलांना विविध योजनेतून लाभ देऊन सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांचे रोजगाराभिमुख पुनर्वसन करा अशा सूचना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यांनी आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालभवन तसेच कुमारी मातांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला.
2014 पासून कुमारी मातांचा प्रश्न प्रलंबित
कुमारी मातांना बालसंगोपन योजना, मनोधौर्य योजना तसेच महिला बचत गटांकडून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा. सोबतच या कुमारी मातांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 2014 पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. यावर अतिशय संथगतीने काम सुरू होते. मात्र, भविष्यात हा प्रश्न त्वरित निकाली काढण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना, महिला व बालविकास, एकात्मिक आदिवासी विकास, महिला आर्थिक महामंडळ, कौशल्य विकास, जिल्हा नियोजन समिती या सर्व विभागांची मदत घेऊन एक परिपूर्ण योजना तयार करावी असे निर्देश यावेळी यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात 91 कुमारी माता
जिल्ह्यामध्ये एकूण 91 कुमारी मातांची नोंद आहे. यात सर्वाधिक झरीजामणी मध्ये 30 कुमारी माता असून, या सर्व महिला अठरा वर्षांवरील आहेत. त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नकरता जिल्ह्यात नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर जिल्ह्यात महिला व बाल भवन तयार करण्यात येणार आहेत, यात हिरकणी कक्ष, अभ्यागत कक्ष, महिला बचत गटांसाठी कक्ष, मिटिंग सभागृह उभारण्यात येणार आहे.
राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षांची लवकरच निवड
राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अद्याप कोणाचीही निवड करण्यात आली नाही, यावर बोलताना राज्यमंत्री व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली असून, येत्या काही दिवसातच महिला आयोगाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरणात शुक्लांची चौकशी करावी - जयंत पाटील