यवतमाळ - आज जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतीसाठी 14 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. दिल्लीची संसद असो की गावातील ग्राम संसद लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने मतदान केलेच पाहिजे, असा युवकांमध्ये सूर उमटत आहे. म्हणूनच आपल्या गावाचा विकास होण्यासाठी आज सकाळपासूनच मतदान केंद्रावरती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या.
निवडणुकीच्या रिंगणात युवक
मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीवर गावातील प्रस्थापित आणि गाव पुढारी यांचीच सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली. केवळ राजकारण करणे आणि नागरिकांना आपसात वादविवाद घडवून गावातील वातावरण तापवणे एवढेच काम केले. मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात युवक उतरल्याने गावाचा विकास होणार अशी आशा मतदारांना आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी...
प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्या एका मताचे मूल्य जाणून घ्यावे. एका मताने राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही येण्याच्या अशाही घटना जगात घडल्या आहेत. त्यामुळे आपल्या गावाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा, असा सूर नवयुवकांतून उमटला आहे.