यवतमाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रेचे सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात आगमन झाले. मात्र, जिल्ह्यात ही यात्रा पोहचताच ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनाचा सामना या यात्रेला करावा लागला.
सर्वात आधी राळेगाव येथे मुख्यमंत्री यांची यात्रा पोहचताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. त्यानंतर यवतमाळ येथे यात्रा पोहचताच प्रहार संघटनेचे नितीन मिर्जपुरे यांनी पोस्ट ऑफिस चौकात काळे झेंडे दाखवून आंदोलन केले.
त्यानंतर सभा स्थळी मुख्यमंत्री पोहचले. भाषणाला सुरुवात केल्यानंतर पुन्हा प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी भाषणा दरम्यान नारेबाजी केली. त्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना नारेबाजी करण्यांकडे पाहून मुख्यमंत्री यांनी उपस्थित लोकांना 'जाऊ द्या, सोडून द्या, एखादा नमुना असतो,' असे सांगत 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.