यवतमाळ- आपले शहर स्वच्छ सुंदर रहावे असे अनेकांना वाटते. मात्र, त्याच शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. यावर यवतमाळच्या तीन तरुणांनी तोडगा काढला आहे. ओल्या कचर्यापासून खत बनवण्यासाठी एक 'सुपर बिन' यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करता येते असा दावा या तरुणांनी केला आहे.
हे सुपर बिन यंत्र तरुणांच्या मागील दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. अनेकदा प्रशासनाकडून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे दिसून येत नाही. मात्र, या तरुणांनी बनवलेले सुपर बिन यंत्र तीन मिनिटांत कचऱ्याचे खत तयार करते. तरुणांना या संशोधनासाठी १० वेळा अपयश आले. मात्र, ११व्यांदा ते यात यशस्वी झाले. अनिकेत इंगोले, सुवेध भेले आणि सुरज ओझा या तिघांनीही आपली कल्पकता वापरून हे यंत्र बनवले आहे. त्याचे नाव त्यांनी 'सुपर बीन' असे ठेवले आहे.
स्वच्छ सुंदर शहर दिसण्यासाठी प्रत्येक घरातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे निर्मुलन याद्वारे शक्य आहे. या खताद्वारे कुठल्याही समस्या निर्माण होत नाहीत. हे पर्यावरण पूरक आणि नैसर्गिक खत आहे. तीन मिनिटांत ओल्या कचऱ्याचे खतात रुपांतर करता येते. कचऱ्यात खतासाठी आवश्यक घटक असतात. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे शेती उपयोगी घटक या खतात आहेत. हे खत शेती आणि बागेसाठी उपयोगी ठरू शकते असा त्या तिघांचा दावा आहे. मागील काही दिवसांपासून कचरा हा प्रश्न गहन बनलेला असून यावर त्यांनी हा उपाय शोधून काढला आहे.
सन २०१७मध्ये तिघांनी शहरातील २०० घरांचे सर्वेक्षण केले होते. त्यातून ६५% ओला कचरा बाहेर टाकला जातो. असे सर्वेक्षणामधून पूढे आले होते. आणि एका घरातून साधारण दोन किलो ओला कचरा बाहेर टाकला जातो. हे सुद्धा सर्वेक्षणामध्ये पुढे आले होते. सर्वेक्षणानुसार त्यांनी यावर काही उपाययोजना करता येईल का असा प्रयत्न केला. बरेच प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते दहाव्यांदा तर मशिन बनवून त्यांना तोडून टाकावी लागली. मात्र, त्यांनी ११व्या वेळी मशिन बनवली त्यावेळी त्यांना यश आले.
सध्या या सुपर बिन यंत्राची कंपनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे. हे तरुण सध्या त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत असून पुढे याच विषयावर काम करणार असे या तरुणांनी सांगितले आहे.