यवतमाळ - प्रत्येक व्यक्तीत कोणती ना कोणती कला असतेच. त्याला प्रोत्साहन मिळाल्यास ती कला पुढे येते. पेनाच्या माध्यमातून राम नामाचे लेखन करत रामायणातील विविध पात्रांची चित्रनिर्मिती करण्याची अनोखी कला यवतमाळमधील निवृत्त झालेल्या येथील एका शिक्षिकेने आत्मसात केली. राजश्री कुळकर्णी, असे या चित्रकार शिक्षिकेचे नाव आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्या चित्रकलेचा हा छंद जोपासत आहे.
हेही वाचा.... धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
बालपणापासूनच चित्र काढण्याची आवड असल्याने राजश्री यांनी औरंगाबाद येथून बीएफए (बॅचलर डिग्री इन फाईन आर्ट) ही पदवी मिळविली. त्यानंतर यवतमाळ येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी स्वीकारली. विद्यादानाचे कर्तव्य बजावत असताना त्यांनी आपल्यातील कलावंतही जोपासला. फॅब्रिक, कॅलीग्राफी, सिरॅमिक पेंटिंगचे काम सुरूच ठेवले. आकर्षक रांगोळी काढत असल्याने कुळकर्णी यांना संस्कार भारतीने विदर्भ रांगोळीप्रमुख म्हणून जबाबदारी दिली. चित्रकलेच्या क्षेत्रात खूप संधी आहेत.
आपण काही तरी वेगळे करायला पाहिजे, या ध्येयाने त्यांना झपाटले. कोलकाता येथे प्रसिद्ध असलेली ‘राम नाम’ लेखन कला त्यांनी आत्मसात केली. पेनाच्या साहाय्याने ‘राम नामा’तून त्यांनी रामायणातील पात्रांची निर्मिती केली आहे. त्यात राम, हनुमान, बाल हनुमान, खारूताई, हरिण, वामन अवतार, अशा रामायणामधील पात्रांचा समावेश आहे. ही कला महाराष्ट्रात कमी प्रमाणात आहे. याशिवाय वारली, मधुबनी, कॉफी अशा विविध प्रकारच्या पेंटिंगदेखील त्या करतात. विशेष म्हणजे शाडू मातीच्या गणपतीचे बनवण्यासाठी दरवर्षी त्या प्रशिक्षण देतात. गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी जोपासलेल्या या कलेचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. ‘राम नामा’तून जास्तीत जास्त चित्रनिर्मिती करून श्रीराम नवमीला या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले.