यवतमाळ - शेतकऱ्याची बँक अशी ओळख असलेल्या यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दोन वर्षांपूर्वी लिपिक आणि शिपाई या पदाकरिता परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे तातडीने या परीक्षेचा निकाल जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार जनता जनशक्ती पक्षाचे उप जिल्हाप्रमुख बिपीन चौधरी यांच्यासह परीक्षार्थी बँकेसमोर आमरण उपोषणाला बसले आहे.
आर्थिक उलाढाल झाल्याची शंका
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 133 लिपिक पदासाठी 412 विद्यार्थी आणि 14 शिपाई पदासाठी 44 विद्यार्थी मुलाखतीकरिता बोलवण्यात आले होते. तर नागपूर उच्च न्यायालयाने आरक्षणातील 42 पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून उर्वरित 105 पदाचा अंतिम निकाल जाहीर करण्याचे आदेश बँकेला दिले होते. मात्र अद्यापही बँकेने अंतिम निकाल जाहीर केला नाही. त्यामुळे मुलाखतीला बोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती असून भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची शंका निर्माण होत आहे.
संचालकांनासमोर ठेवल्या मागण्या
शासनस्तरावरून परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासून त्याआधारे सखोल चौकशी करून अंतिम निकाल जाहीर करण्यात यावा, चौकशीदरम्यान आर्थिक उलाढाल झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नियम बाह्य आकारलेली परीक्षा व्याजासह परत करण्यात यावी, यवतमाळ येथे परीक्षा न घेता अमरावती येथे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर पडलेला आर्थिक बोजा रक्कम पाचशे रुपये प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे, तसेच उच्च न्यायालय नागपूर यांच्या आदेशानुसार उर्वरित आरक्षणाच्या मुद्द्यावर शिल्लक असलेल्या 42 पदांची भरती तत्काळ घेण्यात यावी, अशा मागण्या संचालकांना समोर ठेवण्यात आल्या.