यवतमाळ - शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम तातडीने देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शुक्रवारी बसस्थानक चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.
शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत या कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करण्यात यावा, घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान तातडीने देण्यात यावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसींसाठी स्वतंत्र घरकुल योजना करून आर्थिक तरतूद करण्यात यावी, ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करण्यात यावे, आदिवासींचे प्रलंबित वन हक्क जमीन पट्टे त्वरित वाटप करण्यात यावे, दिवंगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगारांचाही समावेश करण्यात यावा, कांदा तूर व ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे खते व आर्थिक मदत देण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन मोबदला व नोकरी देण्यात यावी, निराधार विधवा माता-भगिनींना वार्षिक दहा हजार रुपये भाऊबीजेची भेट देण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी यवतमाळ येथील बसस्थानक चौकात टाळ-मृदंग वाजवीत प्रहार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहारचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे, विधानसभा प्रमुख बीपिन चौधरी, जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे, विलास पवार, शहर प्रमुख तुषार भोयर, अमित देशमुख, आशिष तूपटकर तसेच सर्व प्रहार कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनचा मोठा सहभाग होता.