यवतमाळ : शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज संभाजी भिडे यांचे यवतमाळमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाच्या ठिकाणी 'प्रहार' आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलकांनी संभाजी भिडे यांचे पोस्टर फाडल्याने यवतमाळमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरोगामी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
हिंदुत्ववादी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी : यवतमाळ येथे आज संभाजी भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यादरम्यान काही पुरोगामी संघटनांनी बळवंत मंगल कार्यालय येथे कार्यक्रमस्थळी भिडे गुरुजी विरोधात घोषणाबाजी करुन बॅनर फाडले. शहरातही अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले. यावेळी हिंदुत्ववादी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरुन प्रहार संघटनेचे बिपिन चौधरी, सामाजिक संघटनांचे समन्वयक प्रा. घनश्याम धरणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यवतमाळमधील संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमास विरोध होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यवतमाळ येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
संभाजी भिडेंविरोधात महिला आक्रमक : यवतमाळ येथे संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाच्या ठिकाणी पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. यावेळी महिलांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांच्या घोषणाबाजीमुळे या परिसरात वातावरण तापले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अवधूतवाडी पोलीस ठाण्यात नेले.
संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल : महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसने संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीवरुन संभाजी भिडे यांच्याविरोधात आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -