यवतमाळ - काँग्रेसच्या महिला नगरसेविकेचा पुत्र असलेल्या सोहराब शब्बीर खान (वय 24) याने आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर कोरोनासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. यामध्ये त्याने लोकांना घाबरवण्याचे काम केले होते. या प्रकरणाची माहिती गोपनीय शाखेतील जमादार रवी जाधव यांना मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांनी तपास करून सोहराब खान याला ताब्यात घेतले.
सोहराब याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. सोहराबने व्हाट्सअप स्टेटसमध्ये कोरोना रुग्णाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात आत्महत्या केल्याचे लिहिले होते. तसेच, धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट स्टेटसला ठेवली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहेत.