यवतमाळ - लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आल्याने बाजारपेठ उघडली आहे. मात्र, मे महिन्यात सूर्य आग ओकत आहे. यवतमाळ जिल्ह्याचे तापमान 46 अंशावर गेल्याने नागरिक दिवसभर घराबाहेर येत नाहीत. रस्तेही सामसूम दिसतात. या कालावधीत विदर्भात सर्वाधिक तापमान असते.
या काळात तापमान 43 ते 46 अंशावर गेल्याने कोरोना संकट काळात जनजीवन ढवळून निघाले आहे. सकाळी दुकान उघडल्यावर 11 वाजेपर्यंत गर्दी कायम राहते. त्यानंतर दिवसभर रस्ते सामसूम पडतात. आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, उन्हामुळे प्रवासी प्रवास करण्याचे टाळत आहेत.
सकाळी प्रवास करण्यावर सर्वांचा भर आहे. तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गारवा मिळावा यासाठी कुलर मोठा आधार ठरत आहे. नागरिक घरात थांबून आरोग्याची काळजी घेत आहेत. पुन्हा काही दिवस नागरिकांना अशीच उन्हाची तीव्रता सोसावी लागणार आहे.