यवतमाळ - संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा आपाआपल्या परीने कोरोनाशी दोन हात करत आहेत. या लढाईत आता कलावंत सुद्धा उतरले आहे. दारव्हा शहरातील हरहुन्नरी कलावंत संतोष ताजने यांनी आपल्या घराच्या भिंतीवर सुरेख चित्र रेखाटून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जनजागृती केली आहे.
संतोष ताजने हे दारव्हा येथील प्रसिद्ध मूर्तिकार तथा चित्रकार आहे. संकट काळात स्वस्थ बसतील ते कलावंत कसले ? संतोष यांनी काहीतरी आगळेवेगळे करण्याचे ठरवले. लॉकडाऊन दरम्यान चक्क स्वतःच्या घराच्या भिंतीवर सुंदर चित्रे रेखाटली. कलेच्या माध्यमातून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरीच राहून सुरक्षित राहण्याचा संदेश दिला. कोरोना विरुद्धच्या लढाईत कलावंत देखील कुठेच मागे नाही, हे संतोष ताजने यांनी दाखवून दिले.