यवतमाळ - जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून वणी विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. वणी मतदारसंघांत मारेगाव, वणी आणि झरी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. साधारणतः 306 पेक्षा जास्त गावं असणाऱ्या या मतदारसंघात 2 लाख 84 हजार 497 इतके मतदार आहेत. विदर्भाचा ब्लॅक डायमंड असलेल्या भूभागाची राजकीय परिस्थीती काय आहे, याचा ईटिव्ही भारतने घेतलेला आढावा...
वणी विधानसभेतील राजकीय चित्र काय सांगत आहे ?
जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक विद्यमान आमदार व माजी दोन आमदार यांच्या राजकीय भवितव्याला कलाटणी देणारी निवडणूक असणार आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षांमधील दुसऱ्या फळीतील उमेदवारांनी पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी मोठी मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसमध्ये तर तब्बल सतरा इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले.
हेही वाचा... महाराष्ट्राचे सिंहासन... कोणाला मिळणार जनतेचा आशिर्वाद?
माजी आमदार वामनराव कासावार यांचे पुत्र राजू कासावार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवला आहे. तर भाजपमध्ये विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र बोर्डे यांच्यासह चार ते पाच जणांनी उमेदवारीसाठी जोर लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. महेंद्र लोढा यांनी आपली दावेदारी जवळपास निश्चित असल्याचे जाहीर केले आहेत. मनसेकडून राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची उमेदवारी निश्चित असून राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले संजय देरकर हे सुद्धा निवडणूक रिंगणात उभे राहणार असल्याचे चित्र दिसत आहेत. एकंदरीतच विधानसभा मतदारसंघांमध्ये नवख्या उमेदवारांचे आव्हान राहणार असल्याचे दिसत आहे.
वणी मतदारसंघातील सामाजिक स्थिती
हा मतदारसंघ कुणबी बहुल आहे. माजी आमदार वामनराव कासावार वगळता, बहुतांश वेळा कुणबी समाजानेच आजवर या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. हा समाज या मतदारसंघाच्या राजकारणाची दिशा निश्चित करतो.
वणी विधानसभेचा निवडणूक इतिहास काय सांगत आहे ?
मागील पंधरा वर्षांमध्ये या मतदारसंघांतील परिवर्तनवादी मतदारांनी वेगवेगळ्या लोकांना संधी दिली. वणी मतदारसंघांमध्ये 1962 आणि 1967 मध्ये काँग्रेसचे विठ्ठल गोहोकार जिंकून आले होते. त्यानंतर 1972 साली अपक्ष दादाराव नांदेकर जिंकून आले. 1978 आणि 1980 साली बापूराव पानघाटे जिंकून आले होते. तर 1885 साली भाकपचे नामदेव काळे जिंकले. त्यानंतर 1990 ते 1999 या काळामध्ये या भागातून काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी बाजी मारली. मात्र 2004 मध्ये शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांनी वणी विधानसभेमध्ये प्रथमच भगवा फडकवला. त्यानंतर शिवसेनेची ताकद सुद्धा वाढत गेली. 2009 मध्ये काँग्रेसचे वामनराव कासावर यांनी मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. 2014 च्या मोदी लाटेत, भाजपचे नवीन उमेदवार संजीवरेड्डी बोदकूरवार यांना मतदारांनी पसंती दिली.
हेही वाचा... ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे
2014 विधानसभा निवडणूक
2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले, त्याचा फायदा संजीवरेड्डी बोदकूरवार यांना मिळाला. त्यांना 45178 मते मिळाली. शिवसेनेचे विश्वास नांदेकर म्हणजे यांना 39572 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे संजय देरकर यांना 31221 मते मिळाली होती. काँग्रेसचे वामनराव कासावार 38964 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर मनसेचे राजू उंबरकर यांना 27054 मते मिळाली.
कोण आहेत वणी विधानसभेचे इच्छुक उमेदवार ?
2019 च्या आगामी विधानसभेसाठी मात्र आपआपल्या पक्षातून तिकीट मिळावे, यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. विद्यमान भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या समोर वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे आव्हान आहे. ते माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे खंदे समर्थक असून, लोकसभा निवडणुकीत त्यांनी बरीच मदत केली होती. तर पक्ष संघटनेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले भाजपचे रवी बेलुरकर आणि विजय पिदुरकर हे सुध्दा वणीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप कोणाला तिकीट देते, यावर बरेच काही अवलंबून राहील.
हेही वाचा... MAHA VIDHAN SABHA : पवारांचा 'तो' प्रसिद्ध खंजीर.. राज्यातील पहिले आघाडी सरकार व सर्वात तरुण मुख्यमंत्री
तर दुसरीकडे शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांना येथील जनतेने 2004 मध्ये विधानसभेमध्ये पाठवलं होतं. त्यानंतर विश्वास नांदेकर यांनी 2009 आणि 2014 मध्ये येथून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली, पण त्यांचा पराभव झाला. पराभवाने खचून न जाता त्यांनी या मतदारसंघात पक्षाचा विस्तार केला. आता शिवसेनेमध्येही नवे स्थानिक नेते उदयास येत आहेत. यामध्ये इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष संजय कातकडे आणि शिंदोला येथील संजय निखाडे हे सुद्धा आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून उत्सुक आहेत. इच्छुकांना त्यांना अपेक्षित पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.
मागील वेळी राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधून विधानसभा निवडणूक लढणारे संजय दरेकर हे आता राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. ते आता काय भूमिका घेतात हे यावरही बरंच अवलंबून आहे.
आरोग्यसेवेच्या माध्यमातून बीड येथून वणीमध्ये आलेले आणि येथेच स्थायिक झालेले डॉ. महेंद्र लोढा हे बीडचे राजकीय वजन वापरून राष्ट्रवादीचे तिकीट मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. आघाडीत काँग्रेसला उमेदवाराला तिकीट मिळाले तर ते स्वतंत्र उभे राहून स्वतःचे अस्तिव दाखविण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये मात्र या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. हा मतदारसंघ आतापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आताच झालेल्या काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये वणी विधानसभेसाठी 17 उमेदवारांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेसचे तिकीट मिळावे म्हणून अनेकजण उत्सुक आहेत. त्यामध्ये डॉ. मोरेश्वर पावडे, टिकाराम कोंगरे, नरेंद्र ठाकरे, देवीदास काळे आणि जिल्हा परिषद सदस्य अरुणा खंडाळकर असे अठरा इच्छुक आहेत. अनेकांनी यवतमाळ येथे काँग्रेस इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती सुध्दा दिल्या आहेत.
हेही वाचा... चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादीची लागणार कसोटी तर भाजपत इच्छुकांची भाऊगर्दी
हा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभेमध्ये येत असल्याने या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांच्या संपर्कात राहून तिकीट मिळावे म्हणून अनेक जण प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे बाळू धानोरकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करणारे आणि लोकसभा जिंकून आणण्यासाठी जीवाचं रान करणारेही आता धानोरकर यांनी आपली पक्षाकडे शिफारस करावी अशी मागणी करीत आहेत. खासदार बाळू धानोरकर कुणाच्या बाजूने कौल देतात हे महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यामुळे या वणी विधानसभेमध्ये काँग्रेस उमेदवार कोण या बाबत अजून अनिश्चितता आहे.
वणी विधानसभेतील काही प्रमुख समस्या
वनी विधानसभेच्या मारेगाव आणि झरी या ठिकाणी एकेक ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र दुर्गम भाग असल्याने शासकीय कर्मचारी वेळेवर हजर नसतात. अनेक रुग्णांना उपचारासाठी वणी येथे पाठवले जाते. या वणी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था कर्मचारी नसल्याने दयनीय झाली आहे. मात्र त्याकडे कोणी लक्ष देत नाही. दुसरीकडे वणी येथे दोन वर्षांपूर्वी ट्रामा केअर सेंटर बांधून तयार झाले आहे, फक्त उद्घाटनाअभावी त्याचा वापर बंद आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूर या ठिकाणी उपचारासाठी जावं लागतं.
हेही वाचा... 'गाव मोठ्ठा विकास छोटा'; कोल्हापूरच्या वाघवे गावची व्यथा
वणी तालुक्यातील ग्रामीण भाग आणि झरी मारेगाव या तालुक्याच्या अनेक गावांमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना किडनी आणि पोटाचे आजार झाले आहेत. कोळसा खदानींमुळे होणारं प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. कोळसा खाणींच्या प्रदूषणाचा फटका या परिसरातील पिकांनाही बसतो. पण त्याकडे कुणीच लक्ष देत नाही.
वणी शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीचे दुष्परिणाम वणीला भोगावे लागत आहेत. चंद्रपुरात दारुबंदी झाल्यामुळे तिथला दारुचा व्यापार वणीमध्ये स्थलांतरीत झाला आहे. यामुळे वणीमध्ये एका अर्थाने आर्थिक सुबत्ता आली असली तरी त्याचे मोठे सामाजिक दुष्परिणामही दिसत आहेत.
वणी विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. कोळश्याची ओव्हरलोड वाहतूक हे रस्ते खराब होण्याचं प्रमुख कारण. खराब रस्त्यांमुळे होणारे भीषण अपघात येथील नेहमीची समस्या बनलीय.
हेही वाचा... जागतिक पर्यटन दिन विशेष : वैभवशाली वारसा असलेला अतुलनीय भारत !
खनिज संपत्तीचं वरदान लाभलेल्या वणीच्या भूभागाला ब्लॅक डायमंड म्हणून ओळखले जातं. वणी परिसरात 13 कोळसा खाणी आहेत. त्यामुळेच दरवेळी विधानसभा निवडणुकीत स्थानिकांना कोळसा खदान परिसरात रोजगार मिळावा हा मुद्दा घेऊन राजकारण तापतं. येथील निवडणूक अनेकांचे राजकीय भविष्य ठरविणारी असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेलं असतं.
वणीच्या कोळसा खाणीत काम करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहे. या भागातील स्थानिक बेरोजगारांना या कोळसा खदान व्यवसायामध्ये नोकरी किंवा तत्सम रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे इथे नेहमी स्थानिकांना घेऊन राजकीय वातावरण तापत असतं. विशेष म्हणजे ज्या भागामध्ये वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोली) साठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी दिल्या, त्या शेतकऱ्यांची मुलं भूमिहीन झाली असून रोजगाराच्या शोधात त्यांना भटकंती करावी लागते. कोळसा खाणीसाठी वेकोलीला जमिनी दिल्यानंतर विस्थापित भूमीपुत्राचं पुनर्वसन झालेल्या ठिकाणी अनेक भागात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे.