यवतमाळ - मुलीचे जमलेले लग्न मोडल्याच्या कारणावरून एका तरुणाची मुलीचे वडील आणि भावाने मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नीलजई कोळसा खाण परिसरात १२ मेच्या मध्यरात्री त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी मुलीचे वडील आणि भावाला अटक केली आहे.
घुघुस येथील तरुणीचे वणी येथील तरुणाशी नुकतेच लग्न जुळले होते. आता काही दिवसातच विवाह होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु, एकदिवशी वर पक्षाकडून अचानकच लग्नास नकार देण्यात आला. त्यामुळे वधू पक्षाकडील मंडळींच्या पाया खालची वाळूच सरकली. लग्न मोडल्याचे कारण काय, हे जाणून घेण्यासाठी मुलीचे वडील प्रभुदास दुर्गे (वय ४८) व भाऊ कृष्णा दुर्गे (वय २४) हे दोघेही वणी येथील वराच्या घरी आले. त्यावेळी घुघुस येथील योगेश प्रकाश जाधव (वय २८) या तरुणाने हे लग्न मोडल्याचे दोघा बापलेकाला समजले.
लग्न मोडल्याचा राग अनावर झालेले दोघेही बापलेक घराकडे माघारी परतत होते. त्याचवेळी बेलोरे चेक पोस्टजवळ योगेश त्यांना दिसला. म्हणून रागाच्या भरात असलेल्या दोघा बापलेकांनी योगेशला पकडले व निलजई कोळसा खाण परिसरात नेऊन त्याचा दगडाने ठेचून खून केला आणि त्यानंतर मृतदेह कोणाला दिसू नये, म्हणून एका खड्ड्यात टाकून त्यावर काडीकचरा टाकला होता.
या घटनेनंतर प्रभुदास व कृष्णा हे दोघेही स्वत:हुन घुघुस येथे येऊन पोलिसांकडे हजर झाले. मात्र, घडलेली घटना ही शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने त्याची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक, ठाणेदार सतीश चवरे यांनी घुघुस गाठून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करीत आहेत.