यवतमाळ - काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी एकास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अजिंक्य मोटके, अभिनव वाडगुरे, अमित भुत आणि गौरीशंकर माने यांना अटक करण्यात आले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांना जामीनावर सुटका करण्यात आली, तर अजिंक्य मोटके याची जामीन न्यायालयाने नामंजूर केल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
यवतमाळ शहरात डायभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालयात बीपीएड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेले काही काश्मिरी विद्यार्थी बुधवारी रात्रीच्या सुमारास वैभव नगर येथे आदित्य मंगल कार्यलयाजवळ बसले होते. यावेळी युवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. काश्मीरमध्ये परत जा, असे सांगून त्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी काश्मीरी युवकांनी लोहारा पोलिसात तक्रार दिल्यानंतर या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
अजिंक्य मोटके याने २०१७ मध्ये असाच एक प्रशोभक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यावेळी त्याच्यावर अवदूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेचा पुरावा वजा नोंद पोलिसांनी सादर केल्याने न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला. आज सकाळी या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची आदित्य ठाकरे यांनी हकालपट्टी केली होती.
पोलिसांनी उमरखेड, पुसद आणि यवतमाळ येथील जम्मू-काश्मीर येथील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. पोलीस प्रशासन तुमच्या सोबत असून कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आले.