यवतमाळ - जिल्ह्यातील एका 64 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती होता. रुग्णामध्ये सारीची लक्षणे होती. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या आठ झाली आहे.
रविवारी 5 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 225 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 161 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 56 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
अॅक्टिव्ह 56 रुग्णांपैकी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 28 जण भरती असून इतर रुग्ण तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 75 नमुने तपासणीकरीता पाठविले आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत 3527 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3397 अहवाल प्राप्त तर 130 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3172 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.