यवतमाळ - कोरोनाच्या काळात प्रत्येकाच्याच मनात भीती निर्माण झाली. त्यातून तरुण, वृद्ध कोणीही सुटले नाही. अनेकांचे मानसिक संतुलनही बिघडले. अशा कठीण काळात दिग्रस तालुक्यातील हरसूलच्या नागसेन वृद्धाश्रमात एका 75 वर्षाच्या वृद्ध महिलेने आपल्या सूरेल आवाजातील गाण्याच्या माध्यमातून वृद्धाश्रममधील सदस्यांना मानसिक आधार दिला आहे.
वृद्धाश्रम झाले जिजाबाईचे घर
75 वर्षीय जिजाबाई भगत. त्यांचा जन्म एका गरीब घरात झाला. तारूण्यात असतानाच आई वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे जिजाबाई आपल्या भावा सोबत राहत. कालांतराने भावाचे लग्न झाले. घरात नवीन मुलगी आली, तिने जिजाबाईला सांभाळून घेतले नाही. त्यानंतर बहीण भावाची ताटातूट झाली. त्यांना आता कोणाचाही आसरा मिळाला नव्हता. जिजाबाई शेतात मोलमजुरी करून पोट भरत असे. काम करत असताना त्या गाणं म्हणायच्या आणि आपल्या सोबत असणाऱ्यांच मनोरंजन करत असे. हाताला काम नसल्याने अनेक वेळा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अनेकांनी त्यांना वृद्धश्रमात दाखल होण्याचा सल्ला दिला, मात्र जिजाबाईच्या मनाला ते मान्य नव्हते. शेवटी एक दिवस त्या वृद्धश्रमात दाखल होत तेव्हापासून हेच त्यांचे घर झाले.
या वृद्धश्रमात जवळपास 35 ते 40 जण राहतात. कोरोनाच्या काळात या सर्व वृद्धांच्या मनात भीती निर्माण झाली. काहींचे तर मानसिक संतुलनही बिघडायला लागले होते. तेव्हा या लोकांना धीर देण्याचे काम जिजाबाई यांनी गाण्याच्या माध्यमातून केले. या सर्व वृद्धांना त्या एकत्र घेऊन बसायच्या आणि आपल्या गोड आवाजात भजन आणि गाणे म्हणून वृद्धांचे मन आकर्षित करून घेत. हळूहळू या वृद्धांच्या मनातील कोरोना बाबतची भीती सुद्धा निघून गेली. मात्र जिजाबाई दररोज गाण्याच्या माध्यमातून इथल्या वृद्धांचे मनोरंजन तर करतेच त्या सर्वांना दुःख तर विसरायला लावताच आहे. शिवाय मानसिक आधारही देत आहे. वास्तविक पाहता जिजाबाई ह्याच आधारहीन आहे. स्वतःच सर्व दुःख विसरून त्या दुसऱ्यांना आधार देत आहे.
वृद्धाश्रमात चाळीसच्यावर वृद्ध
या वृद्धश्रमात 40 वृद्ध राहतात. त्यातील कोणाला आधार नाही तर काहींच्या घरातील कलहमुळे त्यांच्यावर या ठिकाणी राहण्याची वेळ आली. कोरोनाच्या काळात अनेकांना मानसिक आजार जडले. त्यांच्यावर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याची वेळ आली. मात्र, जिजाबाई यांनी आपल्या सुंदर आवाजातील गाण्यामुळे इथल्या वृद्धांचे आरोग्य जपले. कोणीही आजारी पडला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून जिजाबाईचा आवाज अनेकांच्या कानावर पडतो. त्यामुळे बरेच लोक या ठिकाणी येऊन जिजाबाईची भेट घेत आहे. एक 75 वर्षाची आधारहीन समाजातील वृद्धांना आपल्या आवाजातील गाण्याच्या माध्यमातून आधार देत आहे आणि समाजाला जगण्याचा मार्ग दाखवत आहे. या असामान्य जिजाबाईच्या कलेला सलाम.